प्रवास नास्तिकपासून अस्तिकापर्यंतचा : श्री. रामदास गुंजाळ (पारनेर)
सर्व प्रथम माझे गुरु श्री दत्तात्रेय प्रभू यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. हे दत्तात्रेया मी तुम्हांस प्रार्थना करतो की माझे जीवन सदैव तुमच्या सेवेत रुजू राहू दे. हा अनुभव लिहिण्यामागे कुठलाही अहंकार मनामध्ये येऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न असून जर मी यामुळे काही भक्त आपल्या सेवेत जोडू शकलो तर मला कृतार्थ वाटेल. हे दयावरा जर अनावधानाने चूकभूल झाल्यास दयेस पात्र करून घ्या.
II गुरु माझा मायेचा सागर I
दिला त्याने जीवना आकार II
लहानपणापासून मी तसा नास्तिकच होतो. देवाविषयी मनामध्ये पाहिजे तशी श्रद्धा नव्हती. वयाच्या ३२ वर्षानंतर प्रथमच परमेश्वराबद्दल ओढ निर्माण झाली. त्याचे कारण बनले माझे प्रथम गाणगापुर दर्शन. त्या दिवसापासून दत्तमाऊली माझे प्रेरणास्थान बनले. आतापर्यंत मी तीन वेळा गाणगापुरला जाऊन आलो आहे. लॉकडाऊननंतर २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न समारंभामुळे मी व माझे कुटुंबीय तेलंगणा येथे गेलो होतो. त्यावेळी परतत असताना २३ नोव्हेंबरला आम्हाला माहूरला जाण्याचा योग आला. जणू काही दत्त माउलींनीच कृपादृष्टी करून हा योग जुळवून आणला होता. आम्ही त्यादिवशी माहूरगडला पोहोचलो. गडावरील वाटेत खूप सारी वानरे जणू काही आमच्या प्रतिक्षेची वाट पाहत होती असे वाटत होते. आम्हीही थांबून त्यांच्याशी संवाद साधत होतो. डोंगरावरून सभोवारचा निसर्ग खूप नयनरम्य दिसत होता. आम्ही सर्वांनी तेथे दत्तगुरु व रेणुकामाता देवीचे दर्शन घेतले. तसेच अत्रीऋषी आणि अनुसूयामाता यांचेही छान दर्शन झाले. दत्तगुरूंच्या दर्शनाने मी धन्य पावलो असे वाटत होते. एकदा दर्शन घेऊन बाहेर आलो पण मन भरले नाही म्हणून पुन्हा दर्शनास गेलो आणि अक्षरशः डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दत्त माझी माता दत्त माझा पिता असा कृतार्थ भाव जागृत झाला होता. तेथून अजिबात निघावेसे वाटत नव्हते. मनामध्ये परत केव्हा भेट होईल असे वाटत होते. जड अंतःकरणाने मी तेथून निघालो. त्या रात्री आम्ही तेथेच मुक्काम करण्याचे ठरविले. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. दुसऱ्या दिवशी गावी जायला निघायचे होते. रात्रभर झोप लागली नाही. मनात विचार येत होता की पुन्हा सकाळी दर्शनाला जायचे. मी माझी दत्तदर्शनाची आस माझ्या कुटुंबियांजवळ सकाळी उठल्यावर बोलून दाखवली आणि सर्वांनी काहीही आढेवेढे न घेता संमती दाखवली. मनोमन खूप आनंद झाला. पुन्हा एकदा दत्तगुरूंचे दर्शन होणार या विचाराने खूप प्रसन्न वाटत होते. सकाळी लवकर आटोपून आम्ही सर्वजण दर्शनास गेलो. खूप छान दर्शन झाले. आमच्या परतीच्या प्रवासात क्षणोक्षणी या गोड आठवणींनी मन भरून येत होते. आजही मला माहूरच्या रेणुकामातेच्या मुखातील विडा व प्रसाद घरपोच येतो. आणि पुन्हा तेथील दर्शनाचा प्रत्यय येतो.
असेच आयुष्य मार्गक्रमण करत असताना पुन्हा दत्तगुरूंचे दर्शन केव्हा होईल असे विचार सारखे मनामध्ये घोंगावत होते. अशातच एकदा गिरनारला दत्तगुरूंनी १२००० वर्ष तपश्चर्या केली असे ऐकण्यात आले आणि त्यानंतर सतत गिरनारला जाण्याचा केव्हा योग येईल असे विचार मनात येत होते. गिरनारसंबंधी बरेच व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. अनेकांचे गिरनारवारीचे अनुभव युट्युबला पाहिले आणि आपणही केव्हा गिरनारला जाऊ हेच विचार सतत मनात डोकावत होते. म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे. परंतु हे स्वप्न सत्यात उतरणार याची खात्री वाटायला लागली. असेच एकदा मी सहजच माझ्या कंपनीतील सहकाऱ्याजवळ माझ्या गिरनारदर्शन ओढीबद्दल बोललो आणि काय आश्चर्य त्याने क्षणाचाही विलंब न लावता जाऊ कि आपण असे वक्तव्य केले. हा माझ्यासाठी पहिला संकेत होता. मी मनोमन खूप सुखावलो. केव्हा एकदा हा योग येईल असेच सारखे वाटत होते. असेच एके दिवशी आमचे गिरनारला २०२२ च्या दिवाळीमध्ये जाऊ असे ठरले. माझ्या सहकाऱ्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी भेटायला गेलो होतो. माझ्या सहकाऱ्याने त्यांच्या आईला सांगितले की आम्हा दोघांना गिरनारला जायचे आहे आणि त्यांनी तत्पर ‘ तुमचे गिरनार दर्शन होईल ‘ असे बोलून जणू काही आशीर्वादच दिला आणि तत्क्षणी आम्हाला खूप बरे वाटले. हा आमच्यासाठी दुसरा संकेत होता. त्यावेळी माझे सहकारी यांचे ज्येष्ठ बंधू समवेत होते. तेही म्हणायचे तुमचे गिरनार दत्तदर्शन लवकरच होईल. तेही एकदा गिरनारला जाऊन आले होते. त्यानंतर क्षणोक्षणी दत्तभेटीची ओढ लागून राहिली होती. अशातच २०२२ च्या जून महिन्यात माझ्या सहकाऱ्याच्या बंधूने थेट आमचे रेल्वेचे तिकीट आम्हाला न सांगताच बुक केले. आम्हाला सोरटी सोमनाथ करुन गिरनारला जायचे होते. म्हणून त्यांनी मुंबईहून बांद्रा टर्मिनस ते वेरावळ पर्यंतचे तिकीट बुक केले होते. असे म्हणतात की जर तुम्ही मनातून गिरनारला जायचे ठरविले तर काही गोष्टी आपोआप घडतात. असेच आमच्या तिकीटाबाबत घडले होते. मनोमन आम्हाला त्यांच्या ह्या गोष्टीचे खूप नवल वाटले. दुसऱ्याच्या समाधानात आनंद शोधणे आणि मदत करणे जणू काही दत्तगुरुंनीच त्यांना हे सुचविले असावे असे वाटले. आता तर आमचे गिरनारदर्शन नक्की होणार या विचाराने मन भारावून गेले होते.
खूप ऐकले होते की गिरनार दर्शन तसे सोपे नाही. भक्ती, साधना, पूर्व जन्मीचे संचित, शरीराची साथ, निस्वार्थ भाव, अहंकाराचा त्याग आणि सर्वात महत्वाचे दत्तप्रभूंच्या आशीर्वादाशिवाय तुमचे गिरनार दर्शन होऊच शकत नाही. नव्हे नव्हे मनी प्रबळ इच्छा, भाव आणि त्यागाची भावना असेल तर दत्तप्रभूच आपणाकडून हे करवून घेतात. असे असले तरी १०००० पायऱ्या चढणे इतके सोपे नाही हे ऐकण्यात आले होते. म्हणून आम्ही अगोदरच डोंगर चढण्याची प्रॅक्टिस करण्याचे ठरविले. एक महिना अगोदर आम्ही पुण्यातील तळेगाव नजिक सोमाटणे फाटा येथील उंच डोंगरावर घोरावडेश्वर म्हणजेच महादेवाचे मंदिर आहे तेथे जाऊन प्रॅक्टिस करण्याचे ठरविले. नवरात्रकाळात २५ सप्टेंबरला प्रथम आम्ही घोरावडेश्वरला गेलो. सुरुवातीला खूप त्रास झाला कारण तशी आमची काही प्रॅक्टिस नव्हती. आम्हाला चढायला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागला. मंदिरात गेल्यानंतर प्रथम आम्ही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. तेथे पिंडीजवळच गणरायाची मूर्ती आहे. दर्शन करत असतानाच गणरायाच्या मूर्तीला अगोदरच कुण्या भक्ताने अर्पिलेले जास्वंदाचे फुल अचानक खाली पडले. जणू काही साक्षात भगवंताने आमच्या गिरनार दर्शनासाठी कौलच दिला असे वाटले. खूप प्रसन्न वाटत होते. हा आमच्यासाठी तिसरा संकेत होता. त्यानंतर आम्ही पुढचे आणखी तीन रविवार याच ठिकाणी येऊन प्रॅक्टिस केली. इतकी प्रॅक्टिस करूनही गिरनार चढणे जमेल की नाही याबाबत साशंकता होती. शेवटी मनी कुठलाही अहंभाव न ठेवता सर्व काही दत्तगुरुंवर सोपवून दिले व तेच आपल्याकडून हे सर्व करून घेतील असे वाटत होते. या दरम्यान आमचे पुणे ते मुंबई, वेरावळ ते जुनागढ व परतीचे तिकिट बुक झाले होते. हे सर्व काही माझ्या सहकाऱ्याच्या बंधूंनी स्वेच्छेने केले होते. त्यांनी आमचे मुंबई बांद्रा ते वेरावळचे तिकीट तर आधीच बुक केले होते. आम्ही २१ ऑक्टोबर २०२२ रोजी गिरनारसाठी निघणार होतो. आमची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. २१ ऑक्टोबरला सकाळी ७.१५ वाजता पुणे स्टेशनहून मुंबई दादरला डेक्कन क्वीन ट्रेनने निघणार होतो. अखेर तो दिवस आला. सकाळी घरून रिक्षाने पुणे स्टेशनला जायला निघालो. ६ वाजता घरून निघाल्यानंतर ६.३० वाजेपर्यंत स्टेशनला पोहोचण्याचा विचार होता. वाटेत अचानक एके ठिकाणी खूप ट्रॅफिक लागली. वेळेवर स्टेशनला पोहोचेल किंवा नाही याचेच टेंशन येऊ लागले. परंतु १५-२० मिनिटातच ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि वेळेवर स्टेशनला पोहोचलो. पुण्याहून निघून दादरला उतरल्यावर आम्ही तेथून लोकल ट्रेनने बांद्रा टर्मिनसला गेलो.
आमची बांद्रा ते वेरावळ ट्रेन दुपारी १.४० वाजताची होती. तत्पूर्वी आम्ही स्टेशन शेजारील हॉटेल वृंदावन येथे जेवण केले. तेथील काउंटरवर बसलेला माणूस बघून का कुणास ठाऊक पण स्वामी समर्थांची आठवण आली. कदाचित त्यांची मुद्राच खूप प्रसन्न वाटत होती म्हणून की काय. जेवण झाल्यावर आम्ही बांद्रा स्टेशनला गेलो. आमची ट्रेन लागलेलीच होती. आम्ही थेट ट्रेनमध्ये जाऊन बसलो. मनाला विश्र्वासच बसत नव्हता की आपण आता गिरनारसाठी निघालो आहे. खूप प्रसन्न वाटत होते. बरोबर दुपारी १.४० वाजता ट्रेन निघाली. आम्ही जय गिरनारी म्हणून प्रवासास सुरुवात केली. समोर फक्त आणि फक्त गुरुशिखर दिसत होते. केव्हा एकदा आम्ही पोहोचतो असे झाले होते. आमची ट्रेन दुसऱ्या दिवशी वेरावळला पोहोचणार होती. तेथून आम्ही सोरटी सोमनाथ दर्शन करून त्या दिवशी तेथेच मुक्काम करणार होतो. ट्रेन मधून प्रवास करताना शेजारील माणसेही खूप प्रेमळ गप्पा गोष्टी करत होती. का कुणास ठाऊक प्रवासातील सर्वजण खूप प्रेमळ जाणवत होते. आमच्या शेजारी एक वृध्द गृहस्थ बसले होते. ते गुजरात जवळील गावातच राहणारे होते. त्यांचे याआधीच गिरनार दर्शन झाले होते. तेव्हा ते आम्हाला सोरटी सोमनाथ आणि गिरनार बद्दल माहिती सांगत होते. जणू काही देवानेच त्यांची भेट घडवून आणली होती असे वाटत होते. प्रवासात खूप गप्पागोष्टी केल्या व उर्वरीत वेळी दत्त नामस्मरण चालू होते. काय तो आनंद वर्णावा सांगू शकत नाही. आम्ही दोघेही खूप आनंदी आणि प्रसन्न होतो. संध्याकाळी ५.४५ वाजता मला माझ्या मेहुणीशी बोलावे असे वाटले. मी स्लीपर कोचमध्ये माझ्या सीटवर एकटाच बसलो होतो. मी फोन लावला आणि बराच वेळ बोललो. बोलत असताना अचानक मला इतके रडू आले की मला पुढे एकही शब्द बोलायला जमत नव्हते. मी आवाज न करता गप्पच होतो. तिला वाटले फोनला रेंज नसेल म्हणून आवाज येत नाही की काय. तिने फोन ठेवला. मला राहवले नाही. मी पुन्हा फोन केला पण मी काहीच बोलू शकलो नाही कारण मी त्यावेळी खूपच भावूक झालो होतो. कारण ती माझ्या गुरुस्थानी आहे की जिच्यामुळे मला दत्तगुरुंची गोडी लागली होती. तिला पण रडू आले असे जाणवत होते. शेवटी मी पुन्हा फोन करेन असे सांगून फोन ठेवला. माझ्या मित्राने मला रडताना पाहिले परंतु तत्काळ काही विचारले नाही. मीही फक्त कुणाचा फोन होता ते सांगितले.
रात्रीच्या जेवणासाठी आम्ही घरूनच डबा आणला होता. आम्ही रात्री ९ वाजता जेवायला बसलो. आमच्या शेजारील सीटवर ते वृध्द गृहस्थ व त्यांचे कुटुंबीय सुध्दा जेवायला बसले. आम्ही एकमेकांना आमची भाजी शेअर केली. जेवणाच्या शेवटी त्यांनी आणलेले ताक आम्हाला देण्यासाठी ते ग्लास शोधत होते. तितक्यात मळक्या वेशात एक गृहस्थ आमच्या शेजारून जाताना आमच्याकडे ताक मिळेल का असे विचारू लागला. ते शेजारील कुटुंबिय मोकळा ग्लास शोधत होते. तितक्यात आम्ही त्यांना ग्लास आणता का असे बोललो. हे ऐकून तो गृहस्थ तेथून पुढे जात पुढच्या एका सीटवर बसला. ग्लास शोधेपर्यंत आम्ही त्यांना चपाती भाजी देऊ केली परंतु त्यांनी नकार दिला व ताकाचीच मागणी केली. शेजारील कुटुंबिय ग्लास शोधत असतानाच तो गृहस्थ उठून पुढे निघून गेला. आम्हाला वाटले तो ग्लास घेऊन येईल. आम्ही वाट पाहत होतो. परंतु तो काही परत आलाच नाही. आम्हाला तत्क्षणी खूप वाईट वाटले. त्यांनी स्वतःहून आमच्याकडे ताक मागितले परंतु आम्ही देऊ शकलो नाही. असे म्हणतात की देव कधी कुणाच्या रुपात येईल हे सांगुही शकत नाही आणि ओळखुही शकत नाही. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली याचे शल्य सारखे मनाला हुरहुर लावत होते. कोण असेल बरे तो गृहस्थ. आम्ही मनोमन देवाकडे क्षमा मागितली. जेवण झाल्यावर आम्ही रात्री साधारणपणे १०.३० वाजता झोपायला आपापल्या सीटवर गेलो. मला तर पुढील एक दीड तास झोपच येत नव्हती. सारखे मनामध्ये गिरनारबद्दल विचार येत होते. तसेच मनामध्ये प्रश्न घोंगावत होते आपण इतके भाग्यवान कसे की आपल्या नशिबात गिरनार दर्शनाचा हा योग आपसूकच आला. कुठल्या जन्माचे पुण्य म्हणायचे हे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांबद्दल खूप अभिमान वाटत होता की ज्यांच्यामुळे आपल्या जन्माला अर्थ आला आणि दत्तगुरुंच्या दुर्लभ दर्शनाचा योग येणार होता. मी खूप भावूक होऊन अंथरुणातच आसवे पुसत होतो. त्याचबरोबर घरातील सर्वजण आणि नात्यातील जवळच्या माणसांच्या आठवणीने समाधान जाणवत होते.
२२ ऑक्टोबरला आम्ही वेरावळला पोहोचलो. तेथील सोरटी सोमनाथ दर्शन आणि इतर धार्मिक ठिकाणे करून त्या दिवशी आम्ही तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सोमनाथ दर्शन करून आम्ही २३ ऑक्टोबरला जुनागढला जायला निघालो. खूप प्रसन्न वाटत होते. जुनागढला उतरून आम्ही तलेठीला दत्त दर्शनासाठी निघालो. तलेठीमध्ये आम्ही शेरनाथ बापूंच्या गोरक्षनाथ आश्रमात मुक्कामासाठी थांबलो. संध्याकाळी आम्ही तलेठीत फिरायला गेलो. तेथे एका दुकानदाराजवळ आम्ही काश्मिरी बापूंच्या आश्रमाबद्दल चौकशी केली व आम्हाला तिकडे जाण्याची इच्छा आहे असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले तुम्ही श्री गुरुदत्तांवर विश्वास ठेऊन जावे व तेथे जर त्यांनी प्रसाद दिला तर अवश्य घ्यावा. आम्ही संध्याकाळी तिकडे जायला निघालो. एवढ्या घनदाट जंगलातून जाण्याचे धारिष्ट्य आमच्यात कसे काय आले समजत नव्हते. मनात फक्त श्री दत्तगुरुंवरचा विश्वास होता. अतिशय सुंदर जंगल, किड्यांचा किर्र आवाज, रस्त्याच्या बाजूला पाण्याने वाहणारा झरा. खूप प्रसन्न वाटत होते. आम्ही तेथे खूप सारे फोटो आणि व्हिडिओही काढले. जंगलातून मार्गक्रमण करीत संध्याकाळी ६ वाजता आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा सायंकाळच्या आरतीची तयारी चालू होती. काही भक्त अंधार पडेल म्हणून माघारी निघाले होते. आम्ही मात्र तेथेच थांबलो. किंबहुना आम्हाला थांबावे असे सुचविण्यात आले. आमच्यासाठी खूप सुंदर योग जुळून आला होता. आम्ही तासभर प्रतिक्षा करत थांबलो. आश्रमातील घंटा आरती खूपच विलोभनीय अशी होती. तेथे प्रसाद घेऊन आम्ही रूमवर येण्यासाठी निघालो. खूप अंधार होता. थोडी भीती मनामध्ये होतीच. आमच्याबरोबर तलेठीच राहणारे कुटुंबिय सोबत होते. म्हणून आम्हाला आधार वाटला. आम्ही रूमवर पोहचलो. आम्हाला त्या २३ ऑक्टोबरच्या रात्री गुरुशिखर चढून दत्तदर्शनासाठी निघायचे होते. रात्री १०.४५ वाजता आम्ही बाहेर पडलो. निघताना आम्ही शेरनाथ बापूंना भेटलो. त्यांनी आमच्याकडे दत्तप्रसादासाठी दुपारीच पैसे दिले होते व एक नारळ दत्तांसाठी घेऊन जाण्यास सांगितले होते. आमच्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट होती. अशा तपस्वी महापुरुषाने त्यांचा प्रसाद आमच्या हस्ते दत्तगुरुंसाठी देऊ केला होता. सोबत आधीच तलेठीतील एका दुकानातून आणलेली काठी बरोबर घेतली. गिरनार व दत्तशिखर दर्शनास निघताना खूप प्रसन्न वाटत होते.
२३ ऑक्टोबर २०२२ रविवारची ती रात्र. सर्वप्रथम आम्ही लंबे हनुमानाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला व रात्री ११ वाजता गिरनार चढायला निघालो. पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन गुरुशिखर चढण्यासाठी भगवान दत्तात्रेयांना आशिर्वाद मागितला. सर्व अहंकार त्यागला. तेथे सुरुवातीला आम्ही चढावा हनुमानाचे दर्शन घेतले. अंतःकरण अगदी भरून आले होते. पहिली पायरी चढताना पत्नी, मुले व जवळच्या प्रिय व्यक्तींना व्हिडिओ कॉल करून पायरीचे व तेथील स्वामी समर्थ, दत्त मूर्तीं, देवी देवतांचे दर्शन घडविले. आश्चर्य म्हणजे पहिली पायरी चढत असताना एक श्वान आमच्याबरोबर निघाले. जणू काही आमच्यासाठी पाठीराखा म्हणून भगवान गुरु दत्तात्रेयांनी त्याला पाठविले होते. आम्ही गुरुशिखर चढायला सुरुवात केली. ते श्वान पुढे व आम्ही मागे अशी आमची चढाई चालू झाली. असे वाटत होते की जणू काही प्रत्यक्ष भगवान गुरु दत्तात्रेयच त्या श्वानाच्या रुपात आमची साथ देत आहेत. असे म्हणतात की भगवान दत्तात्रेयांची साथ असल्याशिवाय गिरनार चढणे अशक्यच आहे. आम्ही त्या श्वानाच्या रूपात दत्तगुरूंना अनुभवत होतो. वाटत होते प्रत्यक्ष दत्तगुरुच आमचे दत्तभेटीचे स्वप्न पुर्ण करून घेत आहेत. अंतःकरण अगदी गहिवरून गेले होते. या प्रवासात सतत ते श्वान १५-२० फूट पुढे, मी व माझा सहकारी मागे असे आमचे मार्गक्रमण चालू होते. गिरनार चढताना सतत ‘ जय गिरनारी, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ, अलख निरंजन ‘ असे नामस्मरण चालू होते.
२४ ऑक्टोबर सोमवार उजाडला होता. साधारणतः १००० पायऱ्या चढलो असेल. रात्रीचे १२ वाजले होते. अशातच अचानक आमच्या पुढे चालत असलेले श्वान भयभीत होऊन अतिशय जोरात पळत मागे फिरले व आमच्या जवळ येऊन कान टवकारून पुढे पाहत उभे राहिले. ते श्वान मागे फिरताना वाघाच्या डरकाळीसारखा आवाज मी ऐकला होता. वाटत होते भास तर नाही ना. आम्ही आजूबाजूला पाहिले की कुठल्यातरी दुकानाच्या शटरचा तर आवाज नाही ना. तेथे शेजारी पर्वतावर आमच्या बाजूला एक दुकान होते परंतु ते बंद होते आणि त्याच्या पुढच्या बाजूने पडदे होते. कुठलेही शटर वगैरे काही नव्हते. सभोवार निव्वळ काळोख पसरला होता आणि त्या किर्र रात्रीच्या काळोखात तेथे फक्त मी, माझा सहकारी आणि ते श्वान होते. ते श्वान त्या आवाजाने भयभीत होऊन मागे येणे हा आमच्यासाठी एक भयावह असा प्रसंग होता. विशेष म्हणजे माझ्या सहकाऱ्याच्या पत्नीने पुण्याहून निघताना सांगितले होते की तेथे चढताना आजूबाजूला जंगल आहे व वाघांचे वास्तव्य असते. तेव्हा तुम्ही चढताना काळजी घ्या. हा प्रसंग घडताना मला त्वरीत त्याची आठवण आली कारण आवाजही वाघाचाच ऐकू आला होता. परंतु रात्रीच्या अंधारात टॉर्च लावून पुढे पाहिले तर काहीच दिसत नव्हते. हा योगायोग म्हणायचा की दत्त महाराजांनी दिलेली प्रचिती. आम्ही मनोमन दत्तगुरुंचे स्मरण करू लागलो आणि त्या भगवान परमात्म्यावर सर्व काही सोडून दिले. प्रत्यक्ष दत्तगुरुंची साथ असल्याने एक विश्वास होता की माझी दत्तमाऊली आम्हाला असे संकटात सोडूच शकत नाही. दोन ते तीन मिनिटांनी आम्ही पुन्हा प्रवास चालू केला. मनात दत्तगुरुंचे नामस्मरण करत होतो. नामस्मरण करता करता मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली ते कळलेच नाही. गुरुचरित्रात म्हटलेच आहे
‘ ज्याचे हृदयी श्रीगुरु स्मरण त्यासी कैचे भय दारूण ‘.
साधारणतः १२०० पायऱ्या चढून झाल्या होत्या. त्यावेळी आम्हाला एक दत्तभक्त भेटला. तो गुजरातमध्ये सानंद येथे नोकरीस आहे. तसा तो महाराष्ट्रीयन आहे. तो एकटाच आला होता. त्यालाही कुणाची तरी साथ हवी होती. त्यानेही आमच्याबरोबर चढायला सुरुवात केली. आम्हालाही त्याच्या भेटण्याने खूप बरे वाटले. आता आम्ही तिघेजण बरोबर होतो व पुढे दत्तस्वरुप श्वान होते. थकवा जाणवल्यावर आम्ही विश्रांती घेत होतो. आमच्याबरोबर असलेले श्वानही मग आमच्या शेजारी बसायचे व पुन्हा नव्या जोमाने आम्ही चढायला सुरुवात करायचो. असेच एका ठिकाणी आम्ही थकल्याने विश्रांतीसाठी बसलो होतो. ते श्वानही पुढे गेलेले मागे आले आणि आमच्याजवळ बसले. तेही कदाचित थकले असावे. मी त्या श्वानाला बिस्कीट खायला दिले परंतु त्याने काही खाल्ले नाही. माझ्या सहकाऱ्यानेही बिस्कीट खाऊ घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने काही ते खाल्ले नाही. आम्हाला खूप वाईट वाटले. आम्ही त्याच्या रूपात दत्तगुरूंना पाहत होतो. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा नव्या जोमाने चढायला लागलो.
गिरनार चढताना खूप थकल्यासारखे होत होते. पाय खूप दुखत होते. अगदी जड झाले होते व आपसूकच पाऊल पुढे पडत होते. जणू काही दत्तगुरुच आम्हाला बळ देत होते व आमच्याकडून हे करून घेत होते. आम्ही गिरनारला येण्यापूर्वी जी काही प्रॅक्टिस केली होती ती सर्व निष्प्रभ ठरत होती. इतके पाय थकल्यासारखे मी आयुष्यात कधीच अनुभवले नव्हते. सोबत आणलेली काठी आम्हाला खूप आधार देत होती. परंतु पदोपदी वाटायचे चढणे खूप कठीण आहे. आपण गुरुशिखरापर्यंत पोहोचू की नाही. कारण काहीजण मधल्या टप्प्यातूनच मागे फिरताना आम्ही पाहत होतो. काहीजण म्हणायचे मंदिर सकाळी उघडणार आहे. काय करणार तेथे जाऊन. आम्ही मात्र गुरुभेटीसाठी व्याकूळ झालो होतो. मनात एकच ध्यास होता कितीही त्रास झाला तरी चालेल पण गुरुशिखर चढून दत्तपादुकांचे दर्शन घ्यायचेच. असे म्हणतात की दत्तगुरूंचा आशीर्वाद पाठीशी असेल तरच तुम्ही गुरूशिखरापर्यंत पोहोचू शकता. आम्ही तर सर्व त्या दत्त माऊलीवर सोडले होते. फक्त एक विश्वास पाठीशी घेऊन आम्ही मार्गक्रमण करत होतो. आम्हाला भेटलेल्या दत्तभक्ताने आणलेले एनर्जी ड्रिंक पिऊन आम्हाला बरे वाटत होते व चढण्यासाठी नवीन उमेद मिळत होती. तो आमची खूप काळजी घेत होता. आता कसे काय वाटते अशी मध्ये मध्ये विचारपूस करायचा. रात्रीच्या त्या काळोखात गिरनारचा तो परिसर खूप नेत्रदीपक दिसत होता. आम्ही प्रवासात खूप सारे फोटो आणि व्हिडिओ काढले.
५००० पायऱ्या चढून रात्री ३ वाजता आम्ही अंबामाता मंदिराजवळ पोहचलो होतो. पहिल्या पायरीपासुन ते ५००० पायऱ्यांपर्यंत ते दत्तस्वरूप श्वान आमच्या बरोबर होते. आम्ही खूप थकलो होतो म्हणून थोडा वेळ अंबामाता मंदिरासमोर बसलो. इतक्यात ते दत्तस्वरुप श्वान आमच्यापासून केव्हा निघून गेले हे आमच्या लक्षातदेखील आले नाही. तब्बल ४ तास त्याने आमची साथ सोडली नव्हती. असे मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. आम्ही ४ तास चालून इतके थकलो होतो तर त्याची काय अवस्था झाली असेल. का त्याचा एवढा अट्टाहास की त्याने इतक्या रात्री आमच्याबरोबर ४ तास चालावे. काय म्हणायचे याला. यालाच का प्रचिती येणे म्हणतात. आमच्या साशंकित मनाला हा अनुभव लाजवत होता आणि मनात अपराधीपणाची भावना डोकावत होती. कारण उगीच आम्ही गिरनार चढताना घाबरत होतो व नाना शंका मनात आणत होतो. प्रत्यक्ष दत्तगुरुंनी त्या श्वानाला जणू काही आमच्यासाठी पाठविले होते.
गुरुशिखराचा अर्धा पल्ला आम्ही गाठला होता. तेथून थेट दूरवर आम्हाला गुरुशिखर दिसत होते. मन अगदी उल्हसित झाले होते. लवकरच आम्ही गोरक्षनाथ शिखरापर्यंत पोहोचलो. दूरवर खाली दत्त प्रवेशद्वार दिसू लागले. परंतु खूप अंतर असल्यासारखे वाटत होते. काही वेळाने आम्ही दत्तकमानीजवळ पोहोचलो. आता मात्र आमच्या जीवात जीव आला कारण आता आम्ही अंतिम टप्प्यात आलो होतो. आयुष्यातील हि पहिली दिवाळी होती जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत नव्हतो. साक्षात श्रीदत्त गुरुरायांनी हि खास दिवाळी आम्हाला जणू काही भेट दिली होती असेच म्हणावे लागेल. थकलेल्या जड पावलांनी आम्ही कसेबसे पहाटे ५ वाजता गुरुशिखराजवळ पोहोचलो. २४ ऑक्टोबर २०२२ सोमवारचा तो दिवस. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची ती रम्य आणि प्रसन्न अशी पहाट, समोर दत्तमाऊलीचे मंदिर काय तो सुवर्णयोग म्हणायचा. शब्दांतही वर्णन करू शकत नाही. आत्ताही मला हे लिहिताना डोळ्यात अश्रू आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. कारण आम्ही तो स्वर्गीय आनंद अनुभवत होतो. पहाटेचा सूर्योदय आम्हाला खूप भावत होता. गिरनार म्हणजेच गिरी नारायणाची ती भव्यता आणि दिव्यता मनाला खूप आनंद देत होती. हे सारे अनुभवताना आमचीच आम्हाला नजर लागते की काय असे वाटत होते. आम्ही गुरुशिखरावर पोहचलो तेव्हा मंदिर बंद होते. सकाळी ६ वाजता मंदिर उघडणार होते. खूप थकल्यामुळे झोप डोळ्यांवर तरळत ोती. पण दत्तभेटीची आस आम्हाला झोपू देत नव्हती. जवळ जवळ शंभर एक दत्तभक्त तेथे पायऱ्यांवर विसावले होते. कुणी झोपले होते, कुणी गप्पा मारत होते, कुणी नामस्मरण करत होते, खूप थंडी असल्याने कुणी शेकोटी पेटवून शेकत होते. मनात फक्त दत्तध्यान होते. कधी एकदा मंदिर उघडते आणि त्या दत्तमाऊलीला जवळून पाहतो असे झाले होते. काय पावित्र्य त्या स्थानाचे जेथे दत्तमाऊलीने १२००० वर्षे तपश्चर्या केली होती. अशा पावन स्थळाला जाणे म्हणजे साता जन्माचे पुण्य म्हणावे लागेल जेथे माझे दत्तगुरु इतका काळ सानिध्यात होते. अंग रोमांचित होत होते.
आमची उत्कंठा संपली. बरोबर सकाळी ६ वाजता पुजारी आले आणि मंदिर उघडले. आरती सुरु झाली. आम्ही मंदिरापासून २५-३० पायऱ्यांवर उभे होतो. सर्व भाविक आरतीसाठी उभे राहिले. आरती संपल्यावर एकेक जण रांगेत पुढे जाऊन दर्शन घेण्यास आतुर झाला होता. मला पण कधी एकदा आत जातोय असे झाले होते. रांगेने दर्शन सुरू झाले. एकेक जण दर्शन करून बाहेर येत होता. सर्वात प्रथम दर्शन घेतलेला भक्त बाहेर आला. मी त्याच्याकडे एकटक पाहत होतो. त्याचा चेहरा अगदी प्रफुल्लित दिसत होता. का नाही दिसावा किती ओढीने तो दत्तमाऊलीला भेटायला आला होता. कुणास ठाऊक पण मला त्याच्याकडे पाहून वाटायचे हा तर क्षणिक आनंद आहे. एकदा मंदिरातून बाहेर पडल्यावर कुठे मला माझी दत्तमाऊली दिसेल. मला सुद्धा असेच पटकन दर्शन घेऊन बाहेर पडावे लागेल. दर्शन व्हायच्या आधीच ती विरहाची कल्पना मनाला वेदना देत होती. असे वाटत होते रांगेतून बाहेर पडावे व सर्व भक्तांचे दर्शन झाल्यावरच आपण आत जावे जेणेकरून आपण जास्तीत जास्त वेळ दत्तमाऊलींसमोर राहु. डोळ्यांची तृष्णा भागवून घेऊ. एकेक जण रांगेत पुढे सरकत होता तसे आम्हीपण पुढे जात होतो. आम्ही अगदी दत्तमय होऊन गेलो होतो. त्या स्वर्गीय आनंदात न्हाऊन निघालो होतो. अखेर तो क्षण आला ज्याची आम्ही कित्येक महिन्यांपासून चातकासारखी वाट पाहत होतो. मंदिरात शिरल्यावर लगेच माझ्या दत्तमाऊलीवर डोळे विसावले. डोळ्यांची पापणी इकडची तिकडे हालत नव्हती. साता जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. दत्तपादुकांचे दर्शन करताना दत्तमाऊलीला साकडे घातले हे गुरूदत्ता मला तुझ्या चरणापासून दूर लोटू नको. मला पुन्हा पुन्हा तुझ्या भेटीचा योग येऊ दे. बाकी जीवनात काही नको. मला मागण्याची काही गरजच नाही कारण प्रत्येक भक्ताची तू काळजी घेतो. एकदा का कुणी दत्तप्रेमात पडले तर त्याला कुणीही दूर करू शकत नाही. नव्हे ती दत्त माऊली तुमच्या पाठीशी अविरत उभी राहते. हा माझा अनुभव आणि १००% विश्वास आहे. आम्ही बरोबर आणलेला प्रसाद, जपमाळ आणि गुरुचरित्र ग्रंथ दत्त पुजाऱ्याकडून पादुकांना स्पर्शून घेतला. दर्शन घेऊन मी बाहेर आलो.
दर्शनाची रांग तुरळक झाली होती. पुन्हा दुसऱ्यांदा दर्शन घेण्याचा मोह मला आवरला नाही. मी पुन्हा दर्शनासाठी आत गेलो आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. माझे सहकारी बाहेर पायाऱ्यांजवळ वाट पाहत उभे होते. अजूनही मनातली दत्तदर्शनाची तृप्तता संपत नव्हती. पुन्हा पुन्हा दर्शन करावेसे वाटत होते. तेथून पायच निघत नव्हते. कारण पुन्हा केव्हा येणे होईल हे माहीत नाही. भक्त त्या दत्तमाऊलीवर एवढा जीव ओवाळून का टाकतात याचे उत्तर मला मिळाले होते. पुन्हा एकदा दर्शन घ्यावे म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना बोलावले व तिसऱ्यांदा मी दर्शनासाठी आत गेलो. या वेळी आतून बाहेर जाण्यास मन तयारच होत नव्हते. पुजारी आम्हाला म्हणाला तुम्ही पुन्हा पुन्हा आत येताय. बाकी भाविकांनाही दर्शन घेऊ द्या. मी म्हटले गर्दीही कमी झाली होती आणि मन तृप्त झाले नाही, पुन्हा दर्शन करावेसे वाटले म्हणून आलो. अचानक माझे हात त्या पुजाऱ्याच्या चरण दर्शनासाठी पुढे सरसावले. मनात वाटत होते कुठल्या जन्माचे पुण्य म्हणायचे या पुजाऱ्याचे कि जो दररोज दत्तगुरुंच्या सानिध्यात असतो. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि परतीच्या वाटेला निघालो. तीनदा दर्शन घेऊनसुद्धा मन अतृप्त वाटत होते. तेथून निघताना डोळे पाणावतील असे वाटत होते परंतु तसे काही घडले नाही. आपले दर्शन आणि मनोकामना दत्तगुरूंजवळ पोहोचली की नाही याविषयी मन संभ्रमित होते आणि मनात विचारांची घालमेल चालू होती. इतके छान दर्शन होऊनही मन असमाधानी का वाटत होते. दत्तमाऊली अशा अतृप्त मनाने आम्हाला जाऊन देऊच शकत नाही असा मनोमन एक विश्वास होता. माझी ही अतृप्तता दत्त माऊलींनी ओळखली असावी आणि त्याची प्रचिती मला कशी आली ते अनुभवात नंतर पुढे सांगितले आहे. तेथून निघताना मी व्हिडिओ कॉल करून माझी आई, पत्नी, मुले, मेहुणी, साडूबंधू, मेव्हणे, काका आणि मावशीला दत्तगुरूंचे काहीशा अंतराहून दर्शन घडविले आणि माघारी निघालो.
परतत असताना गुरुशिखर उतरून खाली आल्यावर दत्तकमान आहे. तेथेच शेजारी दत्तधुनी व कमंडलूतीर्थ स्थान आहे. दर सोमवारी सकाळी ९ वाजता तेथे धुनी पेटवतात आणि आमच्या नशिबात तो योग आला होता. एक तास आम्ही तेथे नामस्मरण करत थांबलो आणि सकाळी ९ वाजता दत्तधुनी प्रज्वलित करण्यात आली. धुनी प्रज्वलित करत असताना सतत ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा मंत्र सर्व दत्तभक्त मोठ्या आत्मीयतेने जपत होते. खूपच प्रसन्न वातावरण होते. धूनीचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला. निघताना बरोबरच आणलेल्या बाटलीमध्ये आम्ही कमंडलूतीर्थ घेतले.
निघताना लांबूनच व्हिडिओकॉलने माझ्या साडूबंधूंना दत्त धुनीचे दर्शन घडविले. आम्ही खूप थकलेलो होतो. पाय खूप दुखत होते.येताना आम्ही गोरक्षनाथ मंदिराजवळ असलेल्या पापपुण्याच्या गुहेतून पाठीवर सरकत सरकत बाहेर आलो. तेथे आम्ही गुरू गोरक्षनाथांचे दर्शन घेतले व नंतर पुढे अंबामाता शिखराजवळ पोहोचलो. तेथून गोरक्षनाथ शिखर व गुरुशिखर दिसत होते. तेथून व्हिडिओ कॉल करून मी माझा भाऊ व घरच्यांना गिरनार व गुरुशिखर दर्शन घडविले. नंतर अंबामातेचे दर्शन घेतले व बाहेर येऊन थोडा वेळ विसावलो. माझा सहकारी खूप थकलेला होता आणि आपण रोपवेने खाली जाऊ असे म्हणाला. मंदिराशेजारीच रोपवेची सोय आहे. त्यालाच उडान कटोला असेही म्हणतात. मीही रोपवेने जायला तयार झालो. आमच्याबरोबर येताना भेटलेला जो तिसरा भक्त होता त्याने मात्र पायीच उतरून येतो असे म्हटले. आम्ही दोघांनी रोपवेची तिकिटे काढली. रोपवेचा अनुभव खूप छान होता. १० मिनिटातच आम्ही रोपेवेने खाली पोहोचलो.
दुपारचे १२ वाजले होते. तेथे नाश्त्याची उत्तम सोय आहे. आम्हाला खूप भुक लागली होती. आम्ही तेथेच नाष्टा करून शेरनाथ बापू आश्रमातील आमच्या रूमवर गेलो. दुपारचे जेवण आम्ही आश्रमातच केले. आदल्या दिवशी रात्रभर जागे आणि खूप थकलेलो असल्याने दुपारी आम्ही लागलीच झोपलो. संध्याकाळी उठून पायाची मालिश करून घ्यायचा विचार होता. माझ्या मित्राचे पाय खूप दुखत होते. ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी ६.३० वाजता गिरनारच्या पायथ्याशी गेलो. माझ्या मित्राने त्याच्या पायाची मालिश करून घेतली. मी मालिश करायला नाही म्हटले कारण मला थोडे बरे वाटत होते. नंतर आम्ही रूमवर येऊन आश्रमात रात्रीचे जेवण करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी २५ तारखेला जुनागढ ते बांद्रा दुपारी १२.५६ वाजताची ट्रेन होती. त्या ट्रेनने आम्ही निघणार होतो. मन म्हणावे तसे तृप्त झाले नव्हते कारण आमचे दर्शन झाले तर खरे परंतु दत्तमहाराजांनी आपल्याला तृप्त का नाही केले याचीच खंत जाणवत होती. मी अगोदरच ठरविले होते की गिरनारला गुरुशिखरावर गेल्यावर तेथेच जागा शोधून गुरुचरित्रातील १४ वा अध्याय वाचू. परंतु अक्षरशः तेथे पोहोचून खाली उतरेपर्यंत त्याची मला आठवणही आली नव्हती. मनाशी ठरविले सकाळी लवकर उठून ११ माळी जप आणि १४ वा अध्याय वाचू. आमच्या रुमच्या समोरच गिरनार पर्वत होता. वाटले आपण रूमच्या बाहेर बसूनच जप व अध्याय वाचन करू कारण समोरच गिरनार पण दृष्टीस आहे.
सकाळी लवकर उठून आटोपून ७ जपमाळ पूर्ण झाल्या. काय कुणास ठाऊक असे वाटले की बाकी ४ जपमाळ आणि १४ वा अध्याय गिरनार पायथ्याशी असलेल्या लंबे हनुमान मंदीरात वाचू. तेथे प्रसन्नही वाटेल आणि गिरनारच्या पायथ्याशी गुरुचरित्र वाचनाचे समाधानही मिळेल. आम्ही दोघेही लागलीच तिकडे गेलो. परंतु लंबे हनुमानाचे मंदिर बंद होते. सकाळचे १० वाजले होते. मग आम्ही ठरविले आपण पहिली पायरी ओलांडून आतमध्ये जागा शोधू म्हणून आम्ही पुन्हा एकदा पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. माझ्या बहिणी आणि जवळच्या आप्तजनांना व्हिडिओकॉल करून पहिल्या पायरीचे आणि गिरनारचे दर्शन घडवले. नंतर आम्ही आत शिरल्यावर एक छोटेसे मंदिर होते तेथे जाऊन बसलो. मंदिराच्या बाजूलाच एक अघोरी बाबा बसले होते. मंदिरात शिरताना वाटले त्यांनी आपल्याला तेथे बसायला मज्जाव केला तर. मंदिरात छोटीशीच जागा होती आणि कुणी दर्शनास आले तर अडचण होईल असे वाटले. कुणी उगाच उठविले तर सर्व व्यर्थ ठरेल. मी म्हटले आपण आणखी पुढे जाऊन जागा शोधू. बाहेर आल्यानंतर सभोवार असलेला पुज्यमय महाकाय असा गिरनार जणू काही आमची प्रतिक्षा करत होता. त्या वनराईकडे आमचे लक्ष्य वेधले गेले आणि मनात आले की आपण पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या गिरनार पर्वताच्या वृक्षांशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत बसू. आम्ही मग त्या मोकळ्या जागेत साफसफाई करून बसलो.
समोर गिरनार आणि प्रत्यक्ष गुरुशिखर होते. याच जागेच्या सुरुवातीला आम्हाला अगोदरच्या रात्री ते श्वान आणि पुढेच काही अंतरावर वाघाच्या डरकाळीच्या आवाजाचा अनुभव आला होता. आता तर आम्हाला खूप धन्य वाटत होते कारण जणू काही दत्तगुरु आमच्या बरोबरच आहेत. आम्हाला कालचा गुरुशिखरावर अतृप्त वाटणारा विरह जणू काही त्यांनी जाणला होता आणि या सर्व घटना क्रमाने घडवून आणत होते. डोक्यात काहीही नसताना हे सर्व आपोआपच घडत होते. आम्हाला त्यांनी पुन्हा त्यांच्या सानिध्यात आणले होते. आम्ही ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी अगरबत्ती लावून दत्तगुरूंना वंदन करून माळजप पूर्ण केला. त्यानंतर आम्ही १४ वा अध्याय वाचून आरती करून निघणार होतो. १४ वा अध्याय वाचून झाला आणि लागलीच माझ्या मित्राने मला ५२ वा अध्याय वाचण्यास सांगितले. तसा माझा विचारही नव्हता परंतु त्याने अचानक सांगितल्याने मीही ५२ वा अध्याय वाचण्यास सुरुवात केली. माझा मित्र लक्षपूर्वक श्रवण करीत होता. आश्चर्य म्हणजे अध्यायाच्या ९ ते १० ओव्या वाचून झाल्या असाव्या आणि आमच्या दोघांच्याही अश्रूंचा बांध एकाच वेळी फुटला. आजही हा अनुभव लिहिताना मी स्वामी समर्थांच्या मंदिरात बसलेलो आहे आणि आत्ताही माझ्या डोळ्यांतून आसू येत आहेत. माझी मनोमन इच्छा होती की माझ्या अनुभवाची सांगता दत्तगुरूंच्या सानिध्यात व्हावी. ध्यानी मनी नसतानाही नकळतपणे तेही स्वप्न आज पूर्ण झाले. आज मी स्वामी समर्थांच्या मंदिरात बसून हा अनुभव लिहीत आहे. काय म्हणायचे या प्रसंगाला. आमचे गुरुचरित्र वाचन हे निमित्त वाटत होते. असे वाटत होते प्रत्यक्ष दत्तगुरूंनी आम्हाला त्यांच्या चरणाजवळ आणले होते व आम्हा दोघांनाही त्यांनी त्यांच्या कृपेच्या छायेत घेतले होते. धन्य तो गिरनार आणि धन्य ती दत्तमाऊली. ५२ वा अध्याय पूर्ण वाचून झाल्यावर आम्ही दोघांनी दत्तगुरूंची आरती केली. जड अंतःकरणाने परंतु अतिशय तृप्त मनाने आम्ही गिरनार व दत्तगुरूंना वंदन करून रूमवर जाण्यास निघालो. प्रत्यक्ष दत्तात्रेय भगवान भेटल्याचे समाधान आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर झळकत होते. आम्ही दोघेही निशब्द होऊन रूमवर परतत होतो. निशब्द यासाठी कारण आम्ही ती अनुभती मनोमन आकलन करत होतो. खरोखर त्यावेळी वाटत होते आज मी दत्तगुरु पाहिले ‘.
रूमवर जाऊन आमचे सामान घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. रिक्षा करून आम्ही जुनागढ स्टेशनला पोहोचलो. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे ट्रेन चालू झाली. आम्ही मात्र ट्रेनच्या खिडकीतून त्या गिरनारकडे एकटक निरागसपणे बघतच होतो. ट्रेनमध्ये एक जोडपे आमच्या शेजारी बसले होते. त्यांनी आम्हाला विचारले गिरनारला जाऊन आले वाटते. तेही कुतूहलाने आमच्याशी गिरनारविषयी चर्चा करू लागले. तेही आमच्याबरोबर ट्रेनच्या खिडकीतून त्या पवित्र अशा गिरी नारायणाकडे पाहू लागले. दृष्टीक्षेपात असेपर्यंत आम्ही तिकडेच पाहत राहिलो. या सर्व गोड आठवणी घेऊन आम्ही मुंबईत उतरून नंतर बसने पुण्याला पोहोचलो. त्यानंतर पूर्वनियोजन नसतानाही १ जानेवारी २०२३ नववर्ष दिनी मी व माझ्या कुटुंबीयांना नरसोबाच्या वाडीला जाण्याचा योगही आला. शब्दही तोकडे पडावे सांगायला असे भरभरून समाधान मला माझ्या दत्तगुरूंनी दिले आहे. हा अनुभव ऐकून जर काही भक्त दत्तप्रेमात जोडले गेले तर तो मी माझ्या गुरूंचा आशीर्वाद समजेल. धन्य ते अत्रीऋषी अनुसुया माता आणि धन्य ते श्री गुरु दत्तात्रेय. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझा हा अनुभव सर्वांना प्रेरणादायी राहो अशी प्रभू दत्तचरणी प्रार्थना करतो. अनावधानाने कुठे काही अहंकार माझ्या मनात आल्यासारखे वाटले असेल तर मी दत्तगुरु चरणी नतमस्तक होऊन दयेची याचना इच्छितो. असेच प्रेमळ आणि सुखद अनुभव सर्व दत्त भक्तांना येवो, दत्तगुरुंची कृपादृष्टी सर्वांवर राहो, दत्तगुरु सर्वांना त्यांच्या कृपाछायेत अनुग्रहित करो अशी मी दत्त माऊलीस प्रार्थना करतो.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणतात……
II जे भक्त असती माझ्या प्रेमी I
त्यासी प्रत्यक्ष दिसो आम्ही II
खरोखर आपली अपार श्रद्धा, भक्ती, नामस्मरण, सात्विक भाव, शुध्द आचरण आणि सत्कर्माची जोड असेल तर प्रत्यक्ष दत्तगुरु आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. याची मला निसंदेह खात्री आहे.
माझ्या उभ्या आयुष्यात मला कधी देव स्वप्नात दिसला नव्हता. अनेकांना स्वप्नात देव दिसतो. माझ्या पत्नीलाही स्वप्नात अनेकदा श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिले आहे. मलाही खूप वाटायचे की आपल्यालाही स्वप्नात देव दिसावा. काय अनुभूती म्हणायची याला, माझ्या गिरनार भेटीनंतर मला चक्क तीन वेळा श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरुंचे स्वप्नात दर्शन झाले. या विज्ञानयुगात या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत परंतु ते शाश्वत सत्य आहे. सर्वात महत्वाचे मी सर्व दत्तभक्तांना सांगू इच्छितो कुठल्याही अंधश्रद्धा, थोतांड आणि भोंदूगिरीला थारा देऊ नका. कारण आजच्या काळात फक्त आणि फक्त देवच खरा आहे बाकी सर्व मायाजाळ आणि भूलभुलैय्या जग आहे. म्हणूनच त्या जगतनियंत्या परमेश्वराला शरण जा आणि सुंदर आयुष्य जगत रहा. मी सर्व भक्तांसाठी श्री दत्तगुरु चरणी लीन होऊन आर्त साद घालू इच्छितो…….
II अपराधी पातकी या स्वीकार लेकरासी II
II दत्ता दयाघना रे दे ठाव पावलांसी II
II राहो आम्हावरी रे दत्ता तुझीच माया II
II मायेविना तुझ्या रे साराच जन्म वाया II
II आतुर माऊलीसी कवटाळ लेकरासी II
II दत्ता दयाघना रे दे ठाव पावलांसी II
सर्व दत्तभक्तांना माझ्याकडून मंगलमय आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II