गिरनार अनुभूति- एक विलक्षण दत्त अनुभव

सौ. स्मिता शैलेंन पाटील 

बोरीवली (वेस्ट) 

साधारणतः 2016 च्या नोव्हेंबर महिन्यात व्हॉटसअॅपवर एक मॅसेज आला की, पुज्यनीय श्री. प्रमोद केणे काकांनी केलेल्या अनेक पौर्णिमेच्या गिरनारवारीतील अनुभव कथनांचा कार्यक्रम आहे. तोपर्यंत गिरनार कुठे आहे? त्याचे काय माहात्म्य आहे? हे मला काहीच माहीती नव्हते. मला अध्यात्मातील अनुभव ऐकायला आवडतात, त्यामूळे माझी देवावरील श्रद्धा द्रुढ होते असं मला वाटते, म्हणून मी कार्यक्रमाला जायचे ठरवले. 

2016 च्या नोव्हेंबर महीन्याच्या एका रविवारी बोरीवली इस्टला नॅशनल पार्क जवळील चोगले हायस्कूल मध्ये हा कार्यक्रम होता. मी माझ्या मिस्टरांना बरोबर घेऊन कार्यक्रमाला गेले. आम्हाला पोहचायला थोडा उशीरच झाला होता, कार्यक्रम सुरु झाला होता, पूर्ण हॉल भरला होता. आम्हाला व्हरांड्यात बसायला जागा मिळाली. पूर्ण हॉलमध्ये कमालीची शांतता होती. श्री केणेकाकांचे कथन खणखणीत आवाजात सुरु होते. त्यांचे ते दिव्य अनुभव ऐकून अंगावर शहारे येत होते, सकारात्मकता वाटत होती. मी भारावून गेले. मला गिरनारचे माहात्म्य समजले होते, गिरनारीवारीची मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. गुरुशिखरावरील दिव्य पादुकांचे एकदा तरी आपल्याला दर्शन व्हावे असे वाटु लागले. असो, कांकाचे अनुभव कथन संपूच नये असे वाटत होते पण ते संपले. भारावलेल्या अवस्थेत मी तेथुन बाहेर आले. श्री केणेकाकांनी लिहीलेल्या पुस्तकांचा बाहेर स्टॉल लावला होता, तिथे बरीच गर्दी जमली होती. काकांनी लिहिलेल्या “दिव्यत्वाची जेथे प्रचिती” हे पुस्तक घेण्याची माझी इच्छा झाली. तितक्यात माझी ननंद, माझ्या मिस्टरांची आतेबहीण निताताई तिथे आली तिने ते पुस्तक मला भेट दिले. तिने अध्यात्मावरील बरीच पुस्तके मला भेट दिली आहेत, त्यामुळे माझी देवावरी श्रद्धा अधिक दृढ झाली असं मला वाटत, धन्यवाद निताताई. पुस्तक घेऊन मी घरी आले. त्यांचे अनुभव परत परत वाचले, तरी मन भरत नव्हते. पुस्तक वाचून माझी गिरनारवारीची इच्छा अधिक दृढ झाली. ते पुस्तक मी वसईला माझ्या वडीलांना वाचण्यासाठी घेऊन गेले, कारण ते दत्त भक्त होते. नंतर ते पुस्तक तिथेच राहिले. 

 2017 ला माझे वडील अचानक गेले, म्हणून मी स्वामींवर खुप रागावले होते. काही महीने मी स्वामींपासून दूर गेले, पण स्वामींनीच परत मला त्यांच्याकडे खेचून आणले. माऊलीच ती, असो. 

त्यानंतर पुढील दोन वर्षे कोविडने थैमान घातले, तेंव्हा तर कुठे जाण शक्यच नव्हते, त्यादरम्यान मी युट्युबवरील स्वामींचे अनुभव, गिरनारवारीतील लोकांचे अनुभव ऐकत होते, त्यामुळे परत मला गिरनारचे वेध लागले. मी देवाला नेहमी प्रार्थना करत असे की मला गिरणारला न्या, मला गुरुशिखरावरील दिव्य पादुकांच दर्शन घडवा. 2022 च्या ऑक्टोबर महिन्यात अक्कलकोटला जाताना, मी माझी आतेबहीण भक्ती हिला सांगितले की, “मला गिरनारला जायचे आहे, पण कसं काय जाऊ, समजत नाही” आणि नोव्हेंबर मध्ये शाळेच्या ग्रुपवर एक मॅसेज आला की श्री.राहुल डहाणूकर हे गिरणार यात्रा काढत आहेत आणि काही दिवसांनी योगायोगाने माझ्या आत्तेबहीणीनी राहूल डहाणूकरांचाच नंबर मला दिला. मी लगेच त्यांना फोन केला. तेव्हा ते म्हणाले ४ जानेवारी 2023 ला आपण गिरणारला जाणार आहोत. त्यांनी सर्व माहिती मला दिली, मी लगेच मिस्टरांना सांगितले ते ही हो म्हणाले आणि लगेच बुकींग कऊन टाकले, अशक्य वाटणारी गोष्ट शक्य वाटू लागली, मला खूप आनंद होत होता. 

माझ्या प्रकृतिकडे बघून सर्व म्हणत होते, 5000 पायऱ्या जरी रोपवेने असल्या तरी आणखी 5000 पायऱ्या तू चढू शकशील का? मलाही मनात भिती वाटत होती, शंका येत होती, खरच आपण 5000 पायऱ्या चढू शकू का? आणि दोन दिवसांनी युटयुबवरील स्मिता ओक यांचा गिरणारवारीचा व्हीडीओ पाहीला आणि मला हायसे वाटले. हयांच्या सारख्या 75 पेक्षा जास्त वयाच्या बाई जर उत्साहात 5000 पायऱ्या चढू शकतात, तर माझ्यासारखी 50 शीची बाई का नाही चढणार? माझ्यासाठी तो व्हिडिओ प्रचंड प्रेरणादायी ठरला. माझा आत्मविश्वास वाढला, कदाचित मी घाबरत असल्यामुळे स्वामीकृपेनेच तो व्हीडोओ पाहाण्यात आला असावा. मी तयारीला लागले.  

      अचानक काय झाले कुणास ठावूक 1 जानेवारीला मला खूप ताप आला. आम्हाला निघायचे होते 4 जानेवारीला, आणि 1 जानेवारीला रविवार असल्यामूळे डॉक्टर नव्हते मिस्टरांनी तापाची टॅबलेट दिली, कसाबसा रविवार काढला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांनी औषध दिलेले, पण ताप उतरायच नावच घेत नव्हता. रात्री परत डॉक्टरकडे जाऊन औषध बदलून घेतले, तरीही ताप चढत होता उतरत होता. मला वाटलं पूर्ण औषध पोटात गेल की उतरेल ताप, पण पूर्णतः ताप उतरलाच नाही. माझी अवस्था पाहून माझा मुलगा अनूज म्हणाला देखील की, “मम्मी तू नक्की जावू शकशील ना”? मी उसने अवसान आणून म्हणाले, ‘हो’. पण मी मनातून घाबरले होते दुसऱ्या दिवशी जायच होत म्हणून 3 तारखेला संध्याकाळी बोरीवलीला स्वामींच्या मठात गेले. स्वामींना प्रार्थना केली, स्वामीदेवा उद्या निघायचे आहे तुम्ही योग जुळवून आणला आहे, आता तुम्हीच मला ठणठणीत बरं करा. 5000 पायऱ्या चढायचं बळ दया. मठातच माझे मिस्टर माझ्या बरोबर होते, मी त्यांना म्हटलं की, “मला अजून बरं वाटत नाही कसतरी होत आहे, आपण डॉक्टरांकडे परत जाऊया.” आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी औषध परत बदलून दिले. मी त्यांना विचारल, “मी बरी होईल ना? मी उद्या जाऊ शकेल ना?” ते म्हणाले, “का नाही जाऊ शकणार, तू ठणठणीत बरी होणार आहेस. तुझी यात्रा छान होईल, तू जा बबिनधास्त” मला हायस वाटलं. दुसया दिवशी खरच 70% मला बरं वाटलं होतं. 

 आम्ही चार जानेवारीला बुधवारी घरातून 1वाजता निघालो. दुपारी 2 वाजता बोरीवलीला ‘सौराष्ट्र एक्सप्रेस’ पकडली. मला अशक्तपणा होताच, जेवण पण नीट जात नव्हते, मनात धाकधूक होती. गाडीमध्ये रात्री ९ वाजता आम्ही जेवलो आणि झोपी गेलो.. आणि रात्री 3 वाजता मला विचित्र वाटू लागलं. थोडा ताप आला होता, मी घाबरले मला रडायला येत होते. मी नक्की ५००० पायऱ्या चढू शकेन ना? सारख हेच मनात येत होतं. मी मनोमन स्वामींना प्रार्थना केली, “स्वामी मला इथपर्यंत आणलं आहे, आता माझी गिरनारवारी संपन्न करण्याची जबाबदारी तुमची” तितक्यात निताताई आणि माझ्या मिस्टरांनी आदल्यादिवशी तिथे देवाला वाहाण्यासाठी चाफ्याची फुले आणली होती आणि जी बराच काळ झाल्याने कोमेजली होती त्यांचा सुगंध सभोवताली दरवळला, जणू काही स्वामींनी संकेतच दिला की माझी गिरनार वारी संपन्न होणार, आणि सकाळपर्यंत मी पूर्ण बरी झाली होती, माझा ताप उतरला होता. 

दुसऱ्या दिवशी आम्ही 5 वाजता जुनागड स्टेशनला पोहोचलो. थंडी खूप जाणवत होती. रीक्षाने अर्ध्यातासात आम्ही हॉटेलवर पोहचलो, नंतर फ्रेश होऊन 8.30 वाजता आम्ही लंबे मारुती, पहीली पायरी अशी गिरनारच्या आसपासच्या मंदिरातील दर्शन घेतले. नंतर आम्ही जेवणं करून सोमनाथ महादेव मंदिर, भालका तिर्थ इं. मंदिरं बघून रात्री 9 वाजता परत गिरनारला आलो आणि हलकासा आहार घेऊन झोपलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन 6.30 वाजता, आम्ही रोपवे च्या रांगेत उभे राहीलो. बरोबर 7 वाजता आम्ही रोपवे मध्ये बसलो आणि अवघ्या १० मिनटात आम्ही गिरनारच अर्धे अंतर पार केल. आत्ता खरी गिरनार चढायला सुरवात झाली. फ्रेश असल्यामूळे आणि हवेत गारवा असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी गोरक्षनाथ टेकडीपर्यंत पोहचलो. थोडं अंतर चढल्यावर मला थकायला झालं होते. मी बुट घातले होते, पण मागच्या बाजूने अर्धवट चढवले होते म्हणजे पूर्ण घातले नव्हते. अचानक पाठीमागुन एक गृहस्थ जे साधारणतः 70 च्या आसपास असतील, वर्ण गोरापान, त्यांनी सफेद कुर्ता, पायजमा घातला होता आणि बरेचसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखे दिसत होते. ते मला म्हणाले मॅडम बुट पूर्ण घाला, नाहीतर चढायला अडचण होईल. अस म्हणून ते झपझप पूढे गेले. मी बुट पूर्ण चढवले व चालू लागले, आणि गुरुशिखर चढायला सुरवात केली. काही अंतरा नंतर पुढे गेल्यावर मला अशक्तपणा जाणवु लागला, थकायला झाल होतं, पायू थरथर कापू लागले, मी एका जागी उभे राहीले. माझ्या मिस्टरांनी मागे वळून पाहीले तर, माझी अवस्था बघून ते घाबरले, मला म्हणाले काय झालं? बरी आहेस ना ?. चढशील ना? मी त्यांना म्हटलं, “काही नाही ओ थोडां थकवा आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुढेजा येते हळू हळू.” ते पायऱ्या चढू लागले, मीही त्यांच्या पाठीमागून हळू हळू पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरी चढताना स्वामीनामाचा जप चालू होता. आता गुरुशिखर टप्पात आले होते मला खरंच वाटेना की, आता आपण गुरुशिखरा पर्यंत पोचत आहोत, काही अंतर चढल्यावर एका मोकळ्या चौथऱ्यावर आमचा ग्रुप थांबला होता. मी धापा टाकत त्यांना गाठले आणि कठड्याला पाठ टेकून उभे राहीले. नियोजक राहूल म्हणाले की, “इथेच चप्पल काढा, पूढे चप्पल काढायला जागा नाही”. आम्ही चप्पल काढले मी त्यांना विचारले की, माझ्याकडील हिना अत्तर आणि गुलाबजल महाराजांना अर्पण करायचे आहे ते स्वीकारतील का? ते म्हणाले नाही, तिथे काहीच स्वीकारत नाहीत. मी थोडे नाराज झाले. तितक्यात अगोदर भेटलेले गृहस्थ तिथे पोहचले आणि तेही थोडावेळ कठड्याला पाठ टेकून उभे राहीले. त्यांच्या बरोबर एक 27-28 वर्षाचा मुलगाही होता. मी प्रचंड थकलेली पाहून ते म्हणाले, “काय हो एवढ्यातच थकलात, मी तर दर महीन्याला येतो”. तर आमच्यातील एक बाई त्यांना म्हणाली, “आमची ही पहीलीच वेळ आहे.” त्यांनी फक्त स्मित हास्य केलं. माझ्या मिस्टरांनी कौतुकाने त्यांना विचारले, कुठनं येतात? ते म्हणाले, ‘बदलापूर’. थोडंसं जुजबी बोलण झालं आणि आम्ही चढायला लागलो. आमचा ग्रुप पूढे होता ते गृहस्थ माझ्या पूढे होते. मी त्यांना विचारलं, “मला महाराजांना गुलाबपाणी आणि अत्तर अर्पण करायचे आहे तिथे स्वीकारतील का? ते म्हणाले, “हो, स्वीकारतील ना, सर्व स्वीकारतात, तुम्ही दया.” मला आनंद झाला, मी स्वामी नामजप करत पायऱ्या चढत होते, आमचा ग्रुप पूढे होता ते गृहस्थ माझ्या सात-आठ पायऱ्या पुढे होते. परत त्यांनी पाठीमागे वळून पाहिले आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मुलाशी माझ्याकडे बघून कुजबुजू लागले आणि मला म्हणाले कायं ग येतेस ना? ये. अगदी वडीलांच्या मायेने विचारलं, मला भरून आलं. मी हो म्हटलं.  आणि उत्साहाच्या भरात मी गुरुशिखर चढले. 

आता काही सेकंदातच त्या दिव्य पादुकांच दर्शन होणार होत. मला धन्य वाटत होते. शेवटी तो क्षण आला आणि त्या दिव्य पादुकांचे दर्शन झाले, खूप अत्यानंद झाला. असं म्हणतात की, दत्त गुरुंच्या मनात असेल तरच हया दिव्य पादुकांचे दर्शन आपल्याला होते.  त्यामुळे मी सुखावले, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो होते कारण, देवाने मला इथे आणले. मी धोतर आणि उपरण, महाराजांना अर्पण करण्यासाठी भीतभीतच दिले ते त्यांनी स्वीकारल नंतर अत्तर, गुलाबजल दिले, तेही त्यांनी स्वीकारले. मला खूप आनंद होत होता. पूढे असलेले ते गृहस्थ मला म्हणाले, “अगं दिल ना अत्तर आणि गुलाबजाम”, मी हो म्हटले. मला समाधान वाटले, छान दर्शन पण झाले. मी भरुन पावले. म्हटल आता उतरतांना त्या गृहस्थाचे आभार मानुया की ज्यांनी मला प्रोत्साहन दिले व माझा उत्साह वाढवला, त्यांच्यामुळे मी अत्तर व गुलाबजल महाराजांना अर्पण करू शकले. आणि बाहेर येऊन पाहते तर, ते गृहस्थ कुठेच मला दिसले नाहीत. मला कळुन चुकले कि, स्वामींनीच माझे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना पाठवलं होतं. श्री स्वामी समर्थ. 

शेवटी आम्ही गुरुशिखर उतरायला सुरुवात केली.  बघताबघता आम्ही दत्तधुनी व कमंडलू तिर्थाकडे आलो, छान दर्शन घेतले. तिथेच आम्ही  स्वादिष्ट प्रसादाचा आस्वाद घेतला, तिर्थ घेतले. मी धन्य झाले. तिथून परत गोरक्षनाथ टेकडी चढले गोरक्षनाथांचे दर्शन घेतले, परत खाली उतरून अंबामातेच्या मंदिरात गेले. तिथे माता छान विराजमान आहे. मातेला चुनरी अर्पण केली, अंबामातेचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा रोपवेचा आनंद लूटत समाधानाने खाली उतरलो. 

अश्या रितिने स्वामींच्या कृपने गुरुशिखरावरील दिव्य पादुकांचे दर्शन लाभले आणि आमची गिरनारवारी संपन्न झाली. श्री गुरुदेव दत्त!  श्री स्वामी समर्थ!! 

Leave a Comment